पुणे- श्रद्धा वालकर हत्या प्रकरण देशभर गाजत असताना महिलांच्या अत्याचारात घट होताना दिसत नाही. दररोज महिलांवरील अत्याचाराची नवनवीन प्रकरणे समोर येत आहे. दिल्ली असो, वा मुंबई सगळीकडे महिला असुरक्षित असल्याचे चित्र दिसत आहे. यात पुणे शहरही अपवाद नसल्याचे मागील दोन दिवसांपासून दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून दिसत आहे.
एका अल्पवयीन मुलीला महाविद्यालयात जात असताना “तू मला हो म्हण नाहीतर इथेच मारतो’ असे म्हणत एका तरुणाने चाकू दाखवला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सतीश बाळासाहेब क्षीरसागर (वय 24, रा. ढेरे बंगला, मांजरी) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका 17 वर्षीय मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडितेचा मागील 15 दिवसांपासून पाठलाग करत आहे. तो सातत्याने तिला, मला तुझा मोबाईल नंबर दे, तू मला आवडतेस, नाही तर मी तुला महाविद्यालयात जाऊ देणार नाही, असा दम देत होता.
पार्टीत तरुणीवर बलात्कार
महाविद्यालयीन तरुणांच्या पार्टीत मद्याच्या नशेत असलेल्या तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध एका 20 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आरोपी स्वप्नील ठाणगे (वय 24) याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादी 20 वर्षीय तरुणी आणि तिच्या मित्र-मैत्रिणींनी 27 नोव्हेंबर रोजी भूगाव येथे पार्टीला जायचे ठरवले होते. मात्र भूगावला जाण्यासाठी त्यांना कॅब मिळाली नाही. यामुळे यातील एका तरुणाने त्याच्या मित्राच्या कर्वेनगर येथील सदनिकेत पार्टी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मद्य घेऊन सर्व जण हिंगणे होम येथील सदनिकेवर गेले. तेथे मद्य प्यायल्यानंतर काही जण जेवण आणण्यासाठी बाहेर गेले. तर पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण आरोपीसोबत सदनिकेत थांबले होते. पीडित तरुणीला जास्त मद्य प्यायल्याने उलट्या सुरू झाल्या. यानंतर आरोपी तरुणाने तिला गॅलरीमध्ये नेले. तेथे बाहेरून गॅलरीचा दरवाजा लावून तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
टिकटॉक स्टारचा तरुणीवर अत्याचार
एका टिकटॉक स्टारने समाज माध्यमातून तरुणीशी ओळख वाढवली. यानंतर लग्नाच्या आमिषाने तिच्यावर अत्याचार केले. त्याने विवाहित असल्याचे पीडित तरुणीपासून लपवून ठेवले होते. तिने जाब विचारल्यावर तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी विजय बनसोडे (वय 37, रा. अंधेरी, मुंबई) याला अटक केली आहे. पीडित 22 वर्षीय तरुणीने 12 वी नंतर शिक्षण सोडून दिले आहे. तिची टिकटॉक स्टार बनसोडेबरोबर 2019 मध्ये ओळख झाली होती. त्याने विवाहित असल्याचे लपवून ठेवले होते. यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याची त्याने छायाचित्र आणि व्हिडिओ काढले होते. पीडित तरुणीला पहिल्या लग्नाबाबत माहिती झाल्यावर तिने बनसोडेला जाब विचारून संबंध ठेवणे बंद केले होते. याचा राग येऊन बनसोडेने तिला छायाचित्र आणि व्हिडिओ नातेवाईकांना पाठवण्याची भीती घातली होती.
घर मालकिणीला प्रेमाची मागणी
एका भाडेकरूने भर रस्त्यात घर मालकिणीला प्रेमाणी मागणी केली. घर मालकिणीने विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शेखर खटाव (वय 21, रा. हडपसर) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 29 वर्षीय पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत राहाते. मात्र, तिची हडपसर येथे सदनिका असून ती पूर्वी शेखरला भाड्याने दिली होती. भाडे आणायला गेल्यावर शेखर वाईट नजरेने बघत होता. यामुळे त्याला सदनिका सोडायला लावली होती. यानंतर तो शेजरच्याच सदनिकेत राहायला गेला होता. दरम्यान, पीडित महिला विमानतळ परिसरातील मॉलमध्ये खरेदीसाठी जात असताना शेखरने त्यांचा पाठलाग केला. भर रस्त्यात “मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे ओरडला. या प्रकरणाचा तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे करत आहेत.