माधव विद्वांस
पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते व सर्व ग्रह पृथ्वीभोवती न फिरता स्थिर अशा सूर्याभोवती फिरत असतात, हे वास्तव जगापुढे आणले असे निकोलस कोपर्निकस यांचा आज जन्मदिन. मिकोली कॉपेरनिक किंवा निक्लास कोपरनिक या नावाचे लॅटिनीकरण होऊन हे नाव आले आहे. त्यांचा जन्म मध्य पोलंडमधील टॉर्न येथे 19 फेब्रुवारी 1473 रोजी झाला.
त्याचे शिक्षण लॅटिन व ग्रीक भाषांमध्ये झाले. त्यांनी वर्ष 1491 ते 94 याकाळात फ्रेको विद्यापीठात वैद्यक व धर्मशास्त्राचे अध्ययन केले. त्यानंतर 1496 साली ते धर्मविषयक कायद्याच्या अभ्यासासाठी बोलोन्या (इटली) येथे गेले. तेथेच त्यांना ज्योतिषशास्त्राची गोडी लागली व त्याचे त्यांनी अध्ययनही केले. वर्ष 1500 मध्ये पोप यांच्या निमंत्रणावरून ते रोमला गेले व तेथे त्यांनी खगोलशास्त्र व गणित यांवर व्याख्याने दिली. म्हणून 1501 साली शिक्षण अर्धवट सोडून ते पोलंडला परतले, परंतु ते लगेच इटलीतील पॅड्युआ येथे गेले व तेथे त्यांनी वैद्यक व तत्त्वज्ञान यांचे अध्ययन केले.
कॅनन लॉ या विषयातील डॉक्टरेटची पदवी वर्ष 1503 मध्ये संपादन केली. 1505 साली ते हायड्लबर्ग येथे गेले. तेथे काही काळ वैद्यकीय व्यवसाय केल्यावर 1512 साली ते फ्राउएनबुर्ख येथे परतले व शेवटपर्यंत ते तेथेच होते. टॉलेमी यांच्यापासून चालत आलेली पृथ्वीविश्वाच्या मध्याशी आहे असे मानणारी कल्पना कोपर्निकस यांना फारशी पटत नव्हती. कारण सूर्य, चंद्र व ग्रह यांच्या गतीसंबंधीचे नियम व त्यांची दिलेली स्पष्टीकरणे ही सुसंगत वाटत नव्हते. इ.स.पू. 300 मध्ये ग्रीकांनी सूर्य विश्वाच्या मध्याशी आहे असे मानणारी कल्पना मांडलेली आढळते. बुध व शुक्र सूर्याभोवती फिरत असल्याचे जुन्या लॅटिन ग्रंथांमधील उल्लेख त्यांच्या वाचनात आले.
या कल्पनेचा अभ्यास करून त्यांनी पृथ्वीसह सर्वच ग्रह स्थिर अशा सूर्याभोवती फिरत असतात, ही कल्पना मांडली. ही कल्पना त्यांना 1507 च्या सुमारास सुचली व त्यावर अभ्यास करून 1510 साली एका लेखाद्वारे त्यांनी ती मांडली होती; परंतु तिची सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्यांनी खूप संशोधन केले. त्यामुळे ती ग्रंथ स्वरूपात लिहून काढण्यास विलंब झाला.
1530 सालीच त्यांच्या पुस्तकाचे हस्तलिखित तयार होते. मात्र, ही गोष्ट कट्टर धार्मिक नेत्यांना व समाजाला रुचणारी नव्हती. वर्ष 1540 मध्ये त्यांचे शिष्य रेटिकुस यांनी या कल्पनेचा गोषवारा प्रसिद्ध केला. मात्र, त्यांचा मूळ ग्रंथ 1543 साली ते मृत्युशय्येवर असताना न्यूरेंबर्ग मुद्रणालयामध्ये छापला होता व प्रसिद्ध झाला. दरम्यानच्या काळात ही कल्पना पत्रकांच्या व व्याख्यानांद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत होती.
मात्र, हे पुस्तक 1835 सालापर्यंत रोमन कॅथोलिकांना वाचण्यास बंदी करण्यात आलेल्या पुस्तकांच्या सूचित समाविष्ट करण्यात आले होते. त्यानंतर आधुनिक साधनांनी सूक्ष्म वेध घेणे शक्य झाल्याने सूर्य पृथ्वीभोवती न फिरता पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, ही कल्पना प्रयोगांनी सिद्ध झाली. या पुस्तकाचे थ्री कोपार्निकन ट्रिटायझेस हे इंग्रजी भाषांतर ई. रोझे यांनी 1959 साली प्रसिद्ध केले. 24 मे 1543 रोजी फ्राउएनबुर्ख येथे त्यांचे निधन झाले.