पुणे- खासगी रुग्णालयांकडे वापराविना पडून असलेल्या कोविशिल्ड या करोना प्रतिबंधक लसीचे डोस किती शिल्लक आहेत, याची माहिती महापालिकेने मागवली आहे. लसीकरण विभागाने खासगी रुग्णालयांना तसे कळवले आहे.
या रुग्णालयांकडील लसींची माहिती मिळाल्यावर त्यांना त्यांच्याकडून घ्यायच्या, की त्यांना बदलून द्यायच्या याबाबत निर्णय येत्या आठवड्यात राज्य सरकार घेणार आहे.
सध्या शहरात 111 खासगी रुग्णालयांद्वारे कोविशिल्ड लसीचे डोस दिले जातात. त्यांच्याकडे सध्या हजारोंनी डोस शिल्लक असून, काही डोसची मुदत चार ते पाच दिवसांत संपणार आहे. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयांत तसेच शासकीय केंद्रांवरच मोफत लस मिळत आहे.
पुणे शहरात 111 रुग्णालये असून, आतापर्यंत त्यापैकी 24 रुग्णालयांनी त्यांच्याकडे 9 हजार 471 डोस असल्याची माहिती दिली आहे. यापैकी काही लसींची 24 फेब्रुवारी ते 28 मार्चपर्यंत मुदत आहे. ही माहिती गोळा झाल्यावर ती राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल आणि त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल.
– डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण विभागप्रमुख, मनपा