दादरी – उत्तर प्रदेशातील नोएडामधल्या दादरी स्थित चिटहरा गावात रविवारी रात्री काही समाजकंटकांनी एका कुटुंबावर रात्रीच्या अंधारात त्यांच्याच घरात घुसून हल्ला केला. धक्कादायक म्हणजे, या कुटुंबानं ‘तबलीगी जमाती’च्या लोकांना आपल्या घरात आसरा दिल्याच्या संशयावरून हा हल्ला करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिटहरा गावातील सलाउद्दीन भंगार सामानाचा व्यवसाय करतात. त्यांचा एक मुलगा देवबंदमध्ये शिकतो. लॉकडाऊन दरम्यान तो घरी येऊ शकला नाही. त्यामुळे, सलाउद्दीन यांच्या मुलानं तबलीगी जमातच्या निझामुद्दीन मरकझमध्ये हजेरी लावली होती आणि त्यानंतर तो घरी येऊन लपून बसलाय, असा संशय गावातील काही समाजकंटकांच्या मनात निर्माण झाला. यावरून त्यांनी रविवारी रात्री सलाउद्दीन यांच्या घरात घुसून काचा फोडल्या आणि तोडफोड केली. यावेळी, कुटुंबीयांनाही मारहाण करण्यात आली.
पीडित कुटुंबीयांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना फोनवरून दिली.
यानंतर, पोलिसांनी अज्ञातांविरोधात तोडफोड आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या तपासात या कुटुंबाचा ‘तबलीगी जमात’शी कोणताही संबंध अद्याप समोर आलेला नाही.