पिंपरी, दि. 4 – एका गुंडाने दिघी रोडवरील एका दवाखान्यात तोडफोड करत खंडणीची मागणी केली. तसेच डॉक्टरांना मारण्यासाठी धावून गेला. हा प्रकार मंगळवारी (दि. 3) रात्री घडला.
डॉ. रामदास शिवराम पवार (वय 53, रा. मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोपान निवृत्ती गवळी (वय 35, रा. भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी डॉ. पवार यांचे दिघी रोडवर क्लिनिक आहे. ते मंगळवारी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या क्लिनिकमध्ये असताना आरोपी गवळी क्लिनिकमध्ये आला. क्लिनिकमधील रुग्णांना शिवीगाळ, दमदाटी करून दशहत माजवत डॉ. पवार यांना शिवीगाळ करून मला आत्ताच्या आत्ता दहा हजार रुपये दे, नाहीतर तुझे काही खरे नाही, अशी धमकी दिली. डॉ. पवार यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने क्लिनिकमधील सीझर घेऊन डॉ. पवार यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून आला. मी यापूर्वी हाफमर्डर केला आहे. माझ्यावर 326 पण दाखल आहे. तुला माहिती नाही का, अशी जीवे मारण्याची धमकी देत पैशांची मागणी केली.