Vaishali and Praggnanandhaa : एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून बुद्धीबळ या खेळात सर्वोत्तम कामगिरी करणारे प्रज्ञानंद आणि वैशाली हे बहीण भाऊ जगभरात चर्चेत आहे. बुद्धीबळातील त्यांच्या उत्तम कामगिरीने दोघांनी अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. प्रज्ञानंदची बहीण वैशालीने 2 डिसेंबर रोजी स्पेनमधील आयव्ही एल लोब्रेगॅट ओपनमध्ये 2500 FIDE (इंटरनॅशनल चेस फेडरेशन किंवा वर्ल्ड चेस फेडरेशन) रेटिंग मिळवून ग्रँडमास्टरचा किताब जिंकला होता. या विजेतेपदासह वैशाली आणि तिचा भाऊ भारतीय बुद्धिबळ स्टार रमेशबाबू प्रज्ञानंदसह ग्रँडमास्टरचा किताब जिंकणारे जगातील पहिली बहीण-भावाची जोडी बनली आहे. चला तर मग या बहीण-भावाची प्रेरणादायी स्टोरी जाणून घेऊयात…
टीव्हीपासून दूर जाण्यासाठी वडिलांनी मुलांमध्ये बुद्धिबळात वाढवली आवड
चेन्नईतील पडी येथील उपनगरात राहणारे रमेशबाबू आणि नागलक्ष्मी हे एक मध्यमवर्गीय कुटूंबातील अत्यंत मेहनती दाम्पत्य आहे. प्रज्ञानंद आणि वैशाली ही दोन मुले. सध्या सर्वच आई-वडिलांना आपल्या मुलांना टीव्हीपासून दुर कस करायचं हा प्रश्न भेडसावत असतो. हाच प्रश्न रमेशबाबू आणि नागलक्ष्मी यांना देखील पडला होता. त्यामुळे बुद्धिबळप्रेमी असलेल्या रमेशबाबूंना बुद्धिबळ हे त्यावर उत्तर ठरू शकेल, असं वाटलं.
त्यांनी त्यांची सात वर्षांची मुलगी वैशाली हिला बुद्धिबळाच्या क्लासला घातले. हळूहळू तिला तो खेळ आवडला आणि तिने घरातला जास्तीत जास्त वेळ बुद्धिबळासाठी द्यायला सुरुवात केली. त्या वेळी वैशालीचा धाकटा भाऊ प्रज्ञानंद ह्याला देखील केवळ चार वर्षांचा असताना त्या खेळाबद्दल त्याला कुतूहल वाटू लागले होते. त्यावेळी वैशालीने त्यालाही बुद्धिबळाच्या चाली शिकवायला सुरुवात केली. आता भारताला बुद्धिबळातील दोन अव्वल हिरे लाभले आहेत.
10 वर्षांचा असताना त्याने इतिहासातला सर्वांत तरुण इंटरनॅशनल मास्टर बनण्याचा विक्रम केला. वयाच्या 12व्या वर्षी म्हणजेच गेल्या वर्षी जून महिन्यात तो जगातला आतापर्यंतचा दुसरा सर्वांत तरुण, तर भारतातला सर्वांत तरुण ग्रँडमास्टर बनला. त्याचा विक्रम जानेवारीत चेन्नईतल्याच डी. गुकेशने मोडला. कोचिंग, प्रवास, हॉटेल्समध्ये राहणं याच्या खर्चाची हातमिळवणी करणं त्यांच्यासाठी खूप कठीण गेलं. पण मुलांचं टॅलेंट समोर येत गेल्यानंतर मदत आपोआप मिळत गेली.
प्रज्ञानंदची आई त्याच्याबरोबर जगभरातल्या टुर्नामेंट्सना जाते
प्रज्ञानंदची आई त्याच्याबरोबर जगभरातल्या टुर्नामेंट्सना जाते. त्याचे वडील बालपणी पोलिओ झाल्याने अपंग आहेत. ते तमिळनाडू स्टेट कॉर्पोरेशन बँकेत ब्रँच मॅनेजर आहेत. ते घरूनच ऑनलाइन त्याचा खेळ पाहतात. परदेशातील खाद्यपदार्थांचा आपल्या मुलांना विशेष त्रास होऊ नये म्हणून त्या सतत काळजी घेत असतात. विश्वचषक स्पर्धेतही प्रज्ञानंदला कसलाही त्रास होऊ नये म्हणून त्या स्वतः इंडक्शन स्टोव्ह आणि 2 ते 3 भांडी घेऊन गेल्या होत्या. दरम्यान, बुद्धिबळ खेळातील वैशालीचा प्रवास तिचा धाकटा भाऊ रमेशबाबू प्रज्ञानंद याच्याशी जोडलेला आहे. या भावांनी बुद्धिबळात सातत्याने यश संपादन केले आहे.
या दोघांनी ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत दुहेरीत रौप्यपदकांसह अनेक पदके जिंकली आहेत. वडिलांनीच वैशालीला खेळाची ओळख करून दिली. वयाच्या पाचव्या वर्षापासून तिच्या वडिलांनी तिला बुद्धिबळाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. वैशालीने अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाही जिंकल्या आहेत. अशाप्रकारे तिने ग्रँडमास्टर होण्यासाठी बराच प्रवास केला.