वडगाव मावळ, (वार्ताहर) – वडगाव शहराची ४० कोटींची स्वतंत्र पाणी योजनेला तांत्रिक मंजूरी मिळाली असून पुढील महिन्यात पाणी योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. तसेच पुढील काळात वडगाव शहरातील क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याने याव्यतिरिक्त नागरिकांच्या हिताच्या कामांना निधी कमी पडू देणार नाही, असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
वडगाव कातवीच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आमदार सुनील शेळके यांचा मोरया प्रतिष्ठानच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून हभप शंकर महाराज मराठे, हभप तुषार महाराज दळवी, हभप बाळासाहेब काशीद, नितीन महाराज काकडे, हभप भाऊसाहेब टाकळकर उपस्थित होते.
या वेळीमाजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या कार्यकाळात वडगाव नगरपंचायतीला आमदार सुनील शेळके यांनी कोट्यावधी रूपयांचा निधी दिल्याने जवळपास ९० टक्के विकासकामे मार्गी लागली आहे. तसेच आठवडाभरात अजून कोट्यावधी रूपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहेत. उर्वरित विकासकामे लवकरच मार्गी लागतील असा विश्वास नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी व्यक्त केला.
या वेळी सहकारमहर्षी माऊली दाभाडे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, ज्येष्ठ नेते मंगेश ढोरे, तज्ज्ञ संचालक सुभाषराव जाधव, ज्येष्ठ नेते अरूण चव्हाण, कुलस्वामिनी महिला मंच मावळ अध्यक्षा सारिका शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस महिला मावळ तालुकाध्यक्षा दिपाली गराडे आदी उपस्थित होते. अबोली ढोरे यांनी आभार मानले.
ही कामे पूर्ण
वाढत्या नागरिकीकरणाच्या दृष्टीने मूलभूत सुविधा पुरविल्या जात आहे. मुख्य रस्त्यासह सर्व प्रभागातील अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण तसेच डांबरीकरण करणे, हायमास्ट सौर दिवे बसविणे, नगरपंचायत इमारत बांधणे, अग्निशमन वाहन उपलब्ध करणे, विद्युत शवदाहिनी बसविणे, बंदिस्त ड्रेनेज लाईन इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत.