पिंपरी, (प्रतिनिधी) – कोरोना पासून बंद असलेल्या खेळाडू दत्तक योजना प्रत्यक्ष राबविण्याएवजी केवळ अर्ज मागविण्याचा फार्स सुरू आहे. नुकतेच महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने पुन्हा अर्ज मागविण्यात आले आहेत. या पूर्वीही अर्ज मागविले होते, मात्र पुढे कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. पिंपरी चिंचवड महापालिकेने २०१२- १३ या आर्थिक वर्षापासून महापालिका हद्दीतील विद्यार्थी खेळाडूंकरिता खेळाडू दत्तक योजना सुरु केली.
या योजनेत ११ खेळ प्रकारांचा समावेश होत आहे. यामध्ये अॅथलेटिक्स, हॉकी, खो खो, बॉक्सिंग, नेमबाजी, बॅडमिंटन, क्रिकेट, जलतरण, कबडडी, कुस्ती, व लॉनटेनिस आदींचा समावेश आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागाकडे ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद या योजनेसाठी आहे.
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित आंतरविद्यापीठ (राष्ट्रीय) स्तरावर सहभागी झालेल्या विद्यार्थी खेळाडूंना वार्षिक 3 हजार 300 रुपये मिळणार आहेत. तर राष्ट्रीय शालेय स्पर्धात (नॅशनल स्कूल गेम / स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया) तर्फे आयोजित राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थी खेळाडूंना 5 हजार 500 रुपये क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
ही योजना राबविण्यासाठी नवीन धोरण तयार करून तज्ज्ञ खेळाडूंचे मार्गदर्शन घेण्याची सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी दिली होती. मात्र या योजनेत असणाऱ्या मर्यादा पाहता मार्गदर्शन करण्याकडे पाठ फिरविली होती. परिणामी नवीन धोरण तयार झाले नाही. जुन्या धोरणानुसार ही योजना राबविण्याबाबतचा विचार क्रीडा विभाग करत होते. त्यानुसार सध्या खेळाडूंना अर्ज करण्याचे आवाहन क्रीडा विभागाने केले आहे.
इथे करा अर्ज –
इच्छुक खेळाडूंनी क्रीडा विभाग, साईकृपा कमर्शियल कॉम्लेक्स, पीसीएमसी बिल्डींग (३ रा मजला) केएसबी पंप कंपनीसमोर, मुंबई पुणे रोड, खराळवाडी पिंपरी येथे अर्ज करायचे आवाहन महापालिकेने केले आहे. २९ फेब्रुवारी ते २८ मार्च २०२४ या काळात विहित नमुन्यातील अर्ज अथवा महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in
या संकेत स्थळावर अर्ज डाऊन लोड करून घ्यायचे आहे. आवश्यक कागदपत्रांसह १५ मार्च ते २८ मार्च २०२४ या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहे. अधिक माहिती, अटी शर्ती महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.