पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागात फेरबदल करण्यात आले आहेत. प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असणारे संजय नाइकडे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बदली करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते या पदावर कार्यरत होते. आरटीइ, इतर शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांच्या जागेवर संगिता बांगर-घोडेकर यांची नियुक्ती झाली आहे.
तत्कालीन प्रशासन अधिकारी संजय नाइकडे हे शिक्षण विभागात नियुक्त झाल्यानंतर त्यांनी अनेक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला. शाळा दुरुस्ती, इ-क्लास, ग्रंथालय, आदर्श शाळाभेट, भारत दर्शन, रोस्टर, संचमान्यता यासारखी प्रलंबित कामे पूर्ण केली. आरोग्य धन्वंतरी योजना, अर्जित रजा, खराब साहित्य निरस्त करणे,
शाळाबाह्य मुलांना प्रवाहात आणने, दिव्यांग मुलांसाठी शिबिरे, स्पर्धा आयोजन,प्राथमिक शिक्षक वरिष्ठ श्रेणी, मुख्याध्यापक पदोन्नती, ऑनलाईन बदल्या, पदवीधर प्रमोशन ,दर्जेदार प्रशिक्षण आदीसह विविध उपक्रम त्यांनी राबविले होते. त्यांची मंगळवारी (दि. २७) पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बदली करण्यात आली आहे.
नाराजीच्या चर्चा –
नाइकडे यांच्याकडे सुरूवातीच्या काळात प्राथमिक शिक्षण विभागाचा सर्व कार्यभार देण्यात आला होता. कालांतराने कार्यभारात फेरबदल करत त्यांच्याकडील काही अधिकार काढून घेण्यात आले. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. महापालिकेच्या शिक्षण विभागातील त्यांच्या कार्यालयात बहुतांश वेळा ते अनुपस्िथत राहत होते. अधिकार काढल्यानंतर त्यांनी बदलीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा आहे.