कोची – केंद्र सरकारच्या करोना लसीकरण मोहिमेने देशातील नागरिकांचे दोन वर्ग बनवले आहेत. कोव्हॅक्सिन लस घेणारा एक वर्ग आणि कोविशिल्ड लस घेणारा दुसरा वर्ग. कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांच्या हालचालींवर निर्बंध आहेत. तर, कोविशिल्ड घेतलेले कुठेही जाऊ शकतात, असे निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले.
सौदी अरेबियातील नोकरी धोक्यात आलेल्या एका व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, सौदीत त्या लसीला मान्यता नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मान्यता असणाऱ्या लसीचा तिसरा डोस मिळावा, अशी विनंती त्याने केली आहे.
सौदीत जाता येऊ शकत नसल्याने नोकरी गमवावी लागण्याची शक्यता त्याने याचिकेत नमूद केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने केंद्र सरकारला महिनाभरात याचिकाकर्त्याची समस्या सोडवण्याचा आदेश देण्याचे संकेत दिले.
सरकारला उत्तर देण्यासाठी वेळ मिळावा यासाठी पुढील सुनावणी 5 नोव्हेंबरला होणार आहे. लसीकरणाने दोन वर्ग तयार झाल्याने याचिकाकर्त्याच्या हालचाली करण्याच्या मूलभूत हक्कावर अतिक्रमण होत असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.