नवी दिल्ली – उत्तराखंडमधील चीनच्या सीमेलगतची जी गावे आहेत तेथे पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे काम केंद्र सरकारकडून वेगाने सुरू आहे. भारत चीन सीमेवर चामोलीमधील नीती या शेवटच्या गावातही आता दुपदरी मार्गाचे काम सुरू असून त्यामुळे लष्करालाही आपल्या वाहतुकीसाठी सुविधा होणार आहे.
चामोली परिसरात आता रस्ता रूंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मलारीपासून नीती गावापर्यंत सुमारे १७.३५ किलोमीटरच्या रस्त्याचे काम केले जाते आहे. त्यासाठी दगडफोड करून डांबरीकरणही केले जाते आहे आणि लवकरच हे काम पूर्ण होणार आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबरपर्यंतचा वेळ या कामासाठी पुरेसा आहे. हा दुपदरी रस्ता झाल्यावर चीनच्या सीमेपर्यंत जाणे भारतीय लष्कराला अत्यंत सोयीचे होणार आहे. अत्यंत वेगाने बॉर्डरपर्यंत पोहोचता येईल तसेच तेथील जवानांशीही लवकर संपर्क साधता येईल. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्वाचा मानला जातो आहे.
उत्तराखंडचा बराचसा भाग हा चीनच्या सीमेलगत आहे. मात्र हा भाग अत्यंत दुर्गमही असल्यामुळे वेगाने हालचाली करायला किंवा काही ने आण करायला किंवा माणसांची वाहतूक करायला फार अडचणी येतात. त्यामुळे या सगळ्यांच भागात रस्ते तयार करण्याचे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी जास्तीत जास्त दक्षता घेतली जाते आहे. चामोली भागातील रस्त्यामुळे सुरक्षा चोख होणार आहेच, मात्र बाबा बर्फानी यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही त्याचा फायदा होणार आहे.