नवी दिल्ली – निवडणूक आचारसंहितेचे पालन करण्याविषयी दक्षता घेण्याचा इशारा निवडणूक आयोगाकडून उत्तराखंड भाजपला देण्यात आला. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते हरिष रावत यांचे फेरफार केलेले छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यावरून आयोगाने प्रदेश भाजपला कानपिचक्या दिल्या.
रावत यांना मुस्लिम धर्मगुरूच्या स्वरूपात दाखवणारे छायाचित्र काही दिवसांपूर्वी उत्तराखंड भाजपने ट्विटरवरून प्रसिद्ध केले. त्यावरून मागील आठवड्यात निवडणूक आयोगाने उत्तराखंड भाजपला नोटीस बजावली. त्या नोटिसीला प्रदेश भाजपने उत्तर दिले. आचारसंहितेच्या कुठल्या तरतुदीचा भंग करण्याचा आमचा हेतू नव्हता. तसेच, धर्म-जातीच्या आधारे कुठले मतभेद निर्माण करण्याचाही आमचा उद्देश नव्हता, असे उत्तराखंड भाजपने उत्तरादाखल म्हटले.
प्रदेश भाजपच्या ट्विटर हॅंडलवरून ते छायाचित्र हटवण्यात आल्याचेही आयोगाला कळवण्यात आले. मात्र, उत्तराखंड भाजपच्या उत्तराने आयोगाचे समाधान झाले नाही. आचारसंहिता पालनाबाबत भविष्यात अधिक काळजी घेण्याची सूचना आयोगाकडून करण्यात आली. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने सध्या उत्तराखंडमध्ये आचारसंहिता लागू आहे. त्या राज्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.