पिरंगुट – संघटनेत निष्ठेने काम केलेल्यांना पदे दिली आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये पक्ष एक नंबरला आहे. पुढील काळात सर्वांनी जबाबदारीने काम करायचे आहे. सत्तेचा उपयोग जनसामान्यांच्या कल्याणासाठी केला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
घोटावडे (ता. मुळशी) येथे सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे होते.
दुर्गाडे म्हणाले की, बॅंकिंग क्षेत्रात प्रचंड होणारे बदल स्वीकारून आपणाला पुढे जायचे आहे. कर्जावरील व्याजाचे दर कमी करण्यासंदर्भात विचार करावा लागेल. राजकारण न करणे हेच राजकारण आहे.
उपाध्यक्ष सुनील चांदेरे म्हणाले की, कर्जवाटपामध्ये पिछाडीवर असलेला मुळशी तालुका आपणाला पुढे घेऊन जायचा आहे. यावेळी रामभाऊ ठोंबरे, सविता दगडे, विश्वास देवकाते, रणजित शिवतरे, महादेव कोंढरे, सुनील चांदेरे, पांडुरंग ओझरकर आदी उपस्थित होते.