सातारा – येथील जिजामाता कॉलनीत राहणाऱ्या प्रेम लहू पवार (वय 16, मूळ रा. आसनगाव, ता. सातारा) याने शुक्रवारी आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा फोनवरून दिल्यानंतर घरातच गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, पोलीस आत्महत्येचे कारण शोधत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, लहू पवार हे मूळचे आसनगाव (ता. सातारा) येथील रहिवासी असून, ते शिक्षक आहेत. सध्या ते साताऱ्यातील जिजामाता कॉलनीत कुटुंबासमवेत राहतात. ते पत्नीला घेऊन काल (दि. 17) आसनगावला शेतीच्या कामासाठी गेले होते. प्रेम हा एकटाच साताऱ्यातील घरी होता.
आईचा वाढदिवस असल्याने त्याने शुक्रवारी सकाळी फोनवरून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शेजारी राहणाऱ्या काही जणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रेमच्या कुटुंबीयांना फोनवरून माहिती दिली. आसनगावावरून आलेल्या आई-वडिलांनी एकुलत्या एक मुलाचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. यावेळी उपस्थितांचे डोळेही पाणावले. प्रेम साताऱ्यातील एका महाविद्यालयात इयत्ता 11 वीत शिकत होता. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.