पुणे – करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे. कारमध्येही सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे मात्र, सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे.
कारण सॅनिटायझरमध्ये ज्वलनशील अल्कोहोल असल्याने दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे प्रवास करताना आणि कारमध्ये सॅनिटायझरचा वापर करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असल्यामुळे नेहमी थंड जागेवर ठेवावे. सॅनिटायझर वापरताना गरम वस्तू आजूबाजूला ठेवू नये. सॅनिटायझरच्या शेजारी लायटर किंवा माचिससारख्या ज्वलनशील वस्तू ठेवू नये. यामुळे आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. विंडोजवळसुद्धा जिथे सूर्यप्रकाश पडतो तिथे सॅनिटायझर ठेवू नये.
सॅनिटायझर कारमध्ये उघड्यावर ठेवण्यापेक्षा किंवा डिक्कीमध्ये ठेवण्यापेक्षा बॅगमध्ये किंवा पर्समध्ये ठेवावे. जेणेकरून सॅनिटायरचा प्रत्यक्ष संबंध इतर वस्तूंसोबत विशेषतः इंजिनामुळे गरम होण्याऱ्या जागेचा किंवा पार्टस्चा संपर्क येणार नाही.
कार चालवताना मोबाइल चार्जिंगच्या शेजारी सॅनिटायझर ठेवू नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कारमध्ये सॅनिटायझर वापरले असल्यास किंवा हाताला सॅनिटायझर वापरले असल्यास धूम्रपान टाळावे. तसेही गाडी चालविताना धूम्रपान करणे योग्य नाही.
या साध्या टिप्स वापरून तुम्ही सॅनिटायझरमुळे होणाऱ्या दुर्घटनांपासून तुमची कार वाचवू शकतात आणि सॅनिटायझरचा वापर केल्यामुळे तुम्ही करोनापासून वाचू शकतात.