२७ फेब्रुवारी : ‘मराठी भाषा संवर्धन, माझी जबाबदारी’…

आमुच्या मनामनांत दंगते मराठी।
आमुच्या रगारगात रंगते मराठी।
आमुच्या उराउरांत स्पंदते मराठी।
आमुच्या नसानसात नाचते मराठी।

या कविवर्य सुरेश भटांच्या लोकप्रिय ‘मायबोली’ कवितेमध्ये आपल्याला मराठी बद्दल ‘….जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’ या बाबत नक्कीच अभिमान निर्माण होईल अशी स्फूर्ती मिळते. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा सर्व भाषांमध्ये मराठी शोभिवंत आहे हेच सांगितले आहे. आज मराठी भाषेचे संवर्धन व्हावे व ती काळाच्या आड जावू नये म्हणून अनेक प्रकारे प्रयत्न चालू आहेत. सध्या मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी व ती ज्ञानभाषा बनविन्यासाठी तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासकीय पातळीवरूनही प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारने आजवर सहा भाषांना हा दर्जा दिलेला आहे. तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम् व ओडिया या सहा भाषा यात आहेत. हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्यांना भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदान मिळते. एखाद्या भाषेला जेव्हा हा दर्जा मिळतो तेव्हा भाषेची प्रतिष्ठा वाढते. भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोरच उमटवली जाते. मुख्य म्हणजे भाषेच्या विकासकार्यासाठी अधिक चालना मिळत जाते.

भाषा टिकवून ठेवायची असल्यास साहित्य निर्मिती खूप आवश्यक आहे. त्यासाठी दर्जेदार साहित्य हे लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. भाषेला काही निकषांवर अभिजात दर्जा मिळून भाषा लगेच किंवा काही काळात समृद्ध होणार नसते. त्यासाठी अनेक कष्ट हे सर्वांना घ्यावेच लागणार आहे. जो पर्यंत समाज हा साहित्य वाचत नाही, त्यात योगदान देत नाही , तो पर्यन्त कुठलीही भाषा ही कालबाह्य होण्याच्या स्वरूपातच असते. सध्या वाचन , लिखाण संस्कृती ही वाढत्या जागतीकरणांमुळे काही अंशी मागे जात आहे. अनकेदा सोशल माध्यमांवर #ट्विटरसंमेलन, #मराठी यावरुन अनेक साहित्य रसिकांनी आपल्या साहित्यकृतीचे सादरीकरण केलेले दिसते. असा प्रत्येकाला अभिव्यक्त होण्यासाठी खुला असणारा अभिनव उपक्रम सुद्धा कधी कधी भाषेचा प्रवाह चालू ठेवण्यात फलदायीच ठरत असतो.

सध्या जागतिक कोरोना सावटामुळे सांस्कृतिक, कला क्षेत्रावर फार मोठे संकट उभे ठाकले आहे. ही क्षेत्रे देखील भाषा, लोककला, संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी फार महत्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे भाषा संवर्धनाचे काम आता हे अमुक क्षेत्राने केले पाहिजे, ही वेळ आता राहिली नसून, ती प्रत्येकाची जबाबदारी बनली आहे.

आपल्या भाषेचा आपल्याला आभिमान असतो. पण अलिकडे आपल्या तरुणाईला इंग्रजी भाषेचे जास्त आकर्षण! त्यात त्यांचा दोष नाही. कारण सध्याच महाविद्यालयीन शिक्षण, उच्च शिक्षण व नव्या जगाची भाषा ही इंग्रजीतून होत आहे. तर दुसरीकडे काही जण इंग्रजी भाषा एक प्रतिष्ठेची भाषा वाटते, म्हणून तिचा अवलंब करतांना दिसत आहेत. मग हीच तरुण मंडळी पुढे कुटुंब, परिवार या मध्ये बांधले जातात. तेव्हा मात्र यांच्या नव्या पिढीला व त्यांच्या मुलांना मराठी येत नाही, आली तरी ती तोडकी मोडकी येत असते. त्यामुळे त्या मुलांची ‘मायबोली’ ही नष्ट होते. त्यासाठी मराठी ही भाषा टिकवने हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ह्या प्रमाणे ‘मराठी भाषा संवर्धन, माझी जबाबदारी’ ही भूमिका सरकारने जाहीर करून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपण पुन्हा सर्व जण भाषा समृद्धि व संवर्धनासाठी एकत्र येऊन तिच्या साठी प्रयत्न करुयात आणि पुन्हा मराठीला एक नवे वैभव प्राप्त करुण देण्यासाठी जोमाने जे जे शक्य होईल ते ते करुयात. कारण सध्याचे जग हे तर पूर्णपणे डिजीटल होत आहे, त्यामुळे या डिजीटल युगात आपण यासाठी किती प्रामाणिक प्रयत्न करतो हे यापुढचे एक आव्हानचं राहणार आहे.

-अमित येवले

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.