नवी दिल्ली : इराणचे कमांडर कासेम सोलेमनीं अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या पार्श्वभुमीवर निर्माण झालेल्या तणावामुळे या भागातील प्रवासाबद्दल अमेरिकेच्या दूतावासाने आपल्या नागरिकांना प्रवासी इशारा जारी केला आहे. या तणावामुळे या भागात प्रवास करणे धोक्याचे ठरू शकते.
नागरिकांनी या भागात प्रवास करताना संभाव्य धोक्याची जाणीव ठेवावी. संभाव्य धोक्यांपासून दूर रहावे. कोणत्याही आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये आणि स्थानिक प्रसिद्धी माध्यमांवरील बातम्यांवर लक्ष ठेवावे, अशी सूचना अमेरिकेच्या दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी जारी केली आहे.
प्रवासी नागरिकांनी प्रवाशांसाठीची “चेक लीस्ट’चा आढावा घेत रहावे, असेही या प्रवासी इशाऱ्यामध्ये म्हटले आहे. सोलमनी ठार झाल्यापासून अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून विविध देशांच्या महत्वाच्या देशांबरोबर चर्चा सुरू आहे.
इराणविरोधातील संभाव्य हालचालींना वेग आल्यामुळे मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या नागरिकांनी शक्य असल्यास या भागातून बाहेर पडावे आणि आवश्यकता नसेल तर या भागात प्रवास करूच नये, असेही पेंटॅगॉनकडून सूचित करण्यात आले आहे.