दोन्ही बाजूंचे प्रत्येकी 2 सैनिक ठार झाल्याची माहिती
दुबई : इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर दोन्ही बाजूंच्या सुरक्षा रक्षकांनी जोरदार गोळीबार केल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. या गोळीबारामध्ये दोन्ही बाजूंच्या सैनिकांची जीवितहानी झाल्याचे समजते आहे. इराण आणि अफगाणिस्तान दरम्यान सध्या पाणी वाटपाच्या मुद्यावरून तणाव आहे.त्यात सीमेवरील गोळीबारामुळे आणखीन भर पडली आहे.
तालिबानच्या सुरक्षा रक्षकांनी रविवारी सर्वप्रथम गोळीबाराला सुरुवात केली, असा आरोप इराणचे पोलीस उपप्रमुख जनरल कासेम रेझाई यांनी केला आहे. तालिबानी सैनिकांनी इराणच्या सेसतान आणि बलुचिस्तान प्रांतांच्या सेमेवर आणि अफगाणिस्ताच्या निमरोझ प्रांताच्या सीमेवर हा गोळीबार केल्याचा आरोप त्यांनी केला. तालिबानच्या या गोळीबारात इराणच्या सैन्यदलाचे मोठे नुकसान झाल्याचे इराणी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
तर इराणने सर्वप्रथम गोळीबार केल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नफी ताकोर यांनी केला आहे. ताकोर यांच्या म्हणण्यानुसार या गोळीबारात दोन्ही सैन्यदलांचे प्रत्येकी दोन सैनिक मारले गेले आणि अन्य काही जण जखमी झाले आहेत. इराणचे 3 सैनिक मारले गेल्याचे एका इंग्रजी दैनिकाने म्हटले आहे. अफगाणिस्तानने इराणला लागून असलेली सीमा बंद केल्याचेही या दैनिकाने म्हटले आहे.
नकारात्मक मानसिकतेतून आरोप प्रत्यारोप करणे हे दोन्ही देशांच्या हिताचे नाही. केवळ चर्चेद्वारे तोडगा केढला जायला हवा, असे तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.