वॉशिंग्टन – पूर्व लडाखमध्ये चिनी सैनिकांबरोबर भारतीय जवानांच्या झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर अमेरिकेकडून भारताला करण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्र विक्रीमध्ये मोठी वाढ केली जाण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेतील स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे.
अमेरिकेकडून भारताला निर्यात होणाऱ्या शस्त्रास्त्रांमध्ये 1,000 पौंडहून अधिक वजनाचे बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकणाऱ्या सशस्त्र ड्रोनचा समावेश असणार आहे. चीनबरोबरच्या सीमा भागातील तणावाच्या पार्श्वभुमीवर ट्रम्प प्रशासनाने भारताला शस्त्र पुरवठ्यात वाढ करण्याचे ठरवले आहे, असे “फॉरेन पॉलिसी’ या नियतकालिकाने अमेरिकन अधिकारी आणि कॉंग्रेसच्या सहाय्यकांच्या मुलाखतीच्या आधारे म्हटले आहे.
अमेरिकेने अलिकडच्या काही महिन्यांत भारताला शस्त्रास्त्रांच्या नव्या विक्रीसाठीची प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे. सशस्त्र ड्रोनसारख्या उच्च तंत्रज्ञानावर आधारलेल्या पूर्वीच्या प्रशासनाच्या धोरणापेक्षा अधिक प्रगत शस्त्रास्त्रे भारताला देण्याचे निश्चित करण्यात आले आहे, असे या नियतकालिकामध्ये म्हटले आहे.
अमेरिकेत भारतासारख्या विदेशी भागीदाराला लष्करी ड्रोन निर्यातीबाबत बंदीचे धोरण होते. मात्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृतपणे आपल्या नियमात बदल केले आहेत. त्यानुसार आता ही ड्रोन भारताला दिली जाऊ शकणार आहेत.
अमेरिकेकडून भारताला होणारी शस्त्रास्त्र निर्यात 2008 मध्ये शून्याच्या आसपास होती. ती यावर्षी 20 अब्ज डॉलरपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामध्ये एमएच-600 आर सीहॉक हेलिकॉप्टर्स, अपाचे हेलिकॉप्टर आणि लार्ज एअरक्राफ्ट इन्फ्रारेड काऊंटरमेसर यांचा समावेश प्रामुख्याने आहे.