वॉशिंग्टन – अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने रशियातील आपले शेवटची दोन दूतावास कार्यालयेही बंद करण्याचा निर्णय घोषित केला आहे. पुर्व रशियातील व्लादिवस्तोक आणि येकाटेरिनबर्ग या दोन शहरातील अमेरिकन दूतावास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने संसद सदस्यांना दिली.
सन 2017 मध्ये रशियाने अमेरिकेच्या दूतावासांमध्ये काम करणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी केल्याने अमेरिकेने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
अमेरिकेने ही शेवटची दोन कॉन्स्युलेट बंद केली असल्याने आता तेथे अमेरिकेचे केवळ मॉस्को येथील दूतावासाचे केंद्रच कार्यरत राहिले आहे. सेंट पीटसबर्ग येथील कौन्स्युलेट कार्यालयही अमेरिकेने सन 2018 साली बंद केले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने अमेरिकेतल्या सीएटल येथील आपला दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
रशियाच्या एका माजी हेराला ब्रिटनमध्ये विषप्रयोग करून ठार मारण्याचा जो प्रकार झाला त्याचा निषेध म्हणून ही कृती केली जात असल्याचे त्यावेळी रशियाने जाहीर केले होते. अमेरिकेने आपल्या दूतावासाची कार्यालये बंद केल्याने रशियातील नागरिकांना आता अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी मॉस्कोत येण्याशिवाय गत्यंतर उरले नाही.