राजगुरूनगर (पुणे) – खेड पंचायत समितीच्या उपसभापतिपदाची निवडणूक सोमवारी (दि. 28) होणार असल्याची माहिती सभापती भगवान पोखरकर यांनी दिली. दरम्यान, अमर कांबळे यांना उपसभापती संधी देण्याचे ठरले असल्याने सोमवारी केवळ औपचारिकता पार पडेल एवढे मात्र नक्की.
खेड पंचायत समितीच्या उपसभापती ज्योती अरगडे यांनी त्यांच्यापदाचा नुकताच राजीनामा दिला होता. त्यानुसार उपसभापती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निवडणुकीचा अध्यादेश जारी केला असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खेडचे प्रांताधिकारी विक्रांत पाटील यांची नियुक्ती केली आहे. कोविड 19 प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यक त्या नियमांचे पालन करून ही निवडणूक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
खेड पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे वर्चस्व असून 14 पैकी 8 सदस्य सेनेचे आहेत. माजी खासदार,सेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील जो निर्णय घेतील त्या सदस्याला उपसभापती पदावर विराजमान होता येणार आहे. शिवसेनेची लांडेवाडी येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी यांची नुकतीच बैठक झाली त्यात अमर कांबळे यांच्या निवडीला सर्वांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे उपसभापतीपदी अमर कांबळे यांना संधी देण्याचा निर्णय झाला असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.