न्युयॉर्क – अमेरिकेची अव्वल महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने यंदाच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत स्वप्नवत वाटचाल कायम राखली आहे. तिने दुसऱ्या फेरीच्या लढतीत द्वितिय मानांकित ऍनेट कोंतावेटवर 7-6, 2-6, 6-2 अशी मात केली.
या स्पर्धेत मानांकित खेळाडूंच्या पराभवाची मालिका गुरुवारीही कायम राहिली. ब्रिटनची 11वी मानांकित एमा रॅडूकानू 2017 सालानंतर या स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत होणारी पहिलीच गतविजेती खेळाडू ठरली. 2017 साली अँजेलिक कार्बरला पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्यावर्षी रॅडूकानूने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत दाखल होताना सलग 10 सामने जिंकून स्पर्धेचे विजेतेपदही मिळविले होते. यंदा मात्र पहिल्या फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या ऍदलिझ कॉर्नेटविरुद्ध तिचा 6-3, 6-3 असा पराभव झाला.
अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटू व सेरेना विल्यम्सची बहिण व्हिनसला मात्र, स्पर्धेच्या कारकीर्दीतील 80वा विजय मिळवता आला नाही. बेल्जियमच्या ऍरलिसन व्हॅन ओयट्व्हांकने व्हिनचा 6-1, 7-6 असा पराभव केला. पात्रता फेरीतून आलेल्या फ्रान्सच्या क्लारा बुरेलने विम्बल्डन विजेत्या एलिना रायबाकिनाला 6-4, 6-4 असे पराभूत केले.
पुरुष एकेरीत सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीच या स्पर्धेत केळत नसल्याने ज्या खेळाडूंकडे विजेतेपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहे त्यांनाही सध्या आगेकूच करताना झगडावे लागत आहे. स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदाललाही पहिल्या फेरीत कडव्या लढतीनंतरच विजय मिळवण्यात यश आले.
तर, स्पेनच्याच कार्लोस अल्कराझलाही अर्जेटिनाच्या सेबॅस्टिएन बाएझचा पराभव करताना तुल्यबळ लढतीचा सामना करावा लागला. मात्र, यावेळी नशीब त्याच्या बाजूने होते. अल्कराझने पहिले दोन सेट 7-5, 7-5 असे पटकावले होते. व त्याचवेळी दुखापतीमुळे बाएझने सामना सोडल्याने या सामन्यात अल्कराझला विजयी घोषित करण्यात आले. आठवा मानांकित हर्बर्ट हुरकाझने जर्मनीच्या ऑस्कर ओट्टेलावर 6-4, 6-2, 6-4 असा विजय मिळवला.
या स्पर्धेतजर्मनीच्या आंद्रेआ पेटकोव्हिच हीने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत झालेल्या पराभवानंतर चक्क आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्तीचा अत्यंत टोकाचा निर्णय घेतला. ऑलिम्पिक विजेत्या बेलिंडा बेंचिचने पेटकोविचवर 6-2, 4-6, 6-4 अशी मात केली. हा पराभव सहन न झाल्याने तिने हा निर्णय घेतला.