लंडन – ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत सर्वात मानाच्या समजल्या जात असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या पहिल्या फेरीच्या लढतीत अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्सला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेच्या इतिहासात आजवर मुख्य फेरीही गाठू शकलेली नाही अशा फ्रान्सच्या हार्मोनी टानने सेरेनाचा पराभव केला. या पराभवामुळे सेरेनाला सलग दुसऱ्या वेळी या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.
तब्बल सातवेळा विम्बल्डन विजेतेपद मिळवलेली सेरेना या सामन्यात नकारात्मक दिसत होती. तीला आपल्याच सर्व्हिसही राखता येत नव्हत्या. सेंटर कोर्टवर झालेल्या या सामन्यात टानने सेरेनाचे आव्हान संपुष्टात आणले. गेल्या वर्षी सेरेनाला विम्बल्डन स्पर्धेच्या पहिल फेरीच्या लढतीत दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडून माघार घ्यावी लागली होती. बुधवारी झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात टानने सेरेनाला 7-5, 1-6, 7-6 असे पराभूत केले.
त्यापूर्वी झालेल्या लढतींत स्पेनच्या कार्लोस अल्कराझ गार्फिया, अँडी मरे, यानिक सिन्नर आणि रायली ओपेल्का यांना, तर महिलांमध्ये इगा स्वेटेक यांनी दुसरी फेरी गाठली. अल्कराझने जर्मनीच्या यान-लेनर्ड स्ट्रुफवर 4-6, 7-5, 4-6, 7-6, 6-4 असा तब्बल पाच सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात विजय प्राप्त केला. ही लढत तब्बल चार तास आणि 11 मिनिटे रंगली होती.
ब्रिटनच्या मरेने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थचा 4-6, 6-3, 6-2, 6-4 असा पराभव केला. इटलीच्या सिन्नरने स्विल्झर्लंडच्या स्टॅनिस्लास वॉवरींकावर 7-5, 6-4, 6-3, 6-2 अशी मात केली. अमेरिकेच्या ओपेल्काने स्पेनच्या कार्लोस ताबेर्नेरला 7-6, 6-4, 6-4 असे पराभूत केले. महिलांच्या एकेरीत स्वेटेकने क्रोएशियाच्या याना फेटवर 6-0, 6-3 अशी मात केली. ओस्तापेंकोने फ्रान्सच्या डोडिनवर 6-4, 6-4 असा विजय मिळवला. अमेरिकेच्या कोको गॉफने रोमेनियाच्या एलेना-गॅब्रिएला रूसवर 6-2, 6-3, 7-5 असा विजय मिळवला. स्पेनच्या बदोसाने अमेरिकेच्या लुइसा चिरिकोला 6-2, 6-1 असे पराभूत केले.