न्युयॉर्क – ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील मोसमातील अखेरची अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा (युएस ओपन) येत्या 29 ऑगस्टपासून सुरु होत आहे. यंदा या स्पर्धेच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. या स्पर्धेत पुरुष एकेरीचा विजेता तब्बल 21 कोटी रुपयांचा धनी होणार आहे.
उपविजेत्या खेळाडूला 10.50 कोटींचे पारितोषिक मिळणार आहे.आयोजकांनी यंदा या स्पर्धेच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या स्पर्धेची एकूण बक्षिस रक्कम तब्बल 479 कोटी रुपये करण्यात आली. गेल्यावर्षी 459 कोटी रुपयांची बक्षिसे दिली गेली होती.
सेरेनाकडे लक्ष
अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स हीच्या कामगिीकडे यंदा लक्ष राहणार आहे. गेल्या काही मोसमांपासून येत असलेल्या अपयशामुळे सेरेनाने या स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या स्पर्धेत ती कशी कामगिरी करते व कारकीर्दीची अखेर विजेतेपदाने करणार का याकडे चाहत्यांचे लक्ष राहणार आहे.
आता मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या टेनिसपटूला जवळपास 64 लाख रुपये मिळणार आहेत. विजयी सलामी देणारा खेळाडू 96 लाखांचा मानकरी ठरेल. तर उपांत्यपूर्व फेरीसाठी 3.55 कोटी व उपांत्य फेरीसाठी 5.63 कोटींची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.