वॉशिंग्टन – भारतात करोनाची स्थिती अत्यंत धोकादायक बनली असून या स्थितीबद्दल अमेरिकेतील अनेक खासदारांनी चिंता व्यक्त केली आहे. या स्थितीत भारताला तातडीची मदत करण्याची सूचना त्यांनी बायडेन प्रशासनाला केली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार एडवर्ड मार्के यांनी म्हटले आहे की आज आपल्याकडे पैसा आहे आणि त्याची अन्य लोकांना गरज आहे, त्यामुळे त्यांना ही मदत करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. भारतात आज जगातील सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे याकडेही त्यांनी बायडेन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अमेरिकेकडे पुरेशी लस असताना आपण भारतालाही ती पुरवली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकन संसदेच्या विदेश व्यवहारविषयक समितीचे अध्यक्ष ग्रेगरी मिक्स यांनी म्हटले आहे की, भारतातील कोविडची स्थिती अधिकाधिक चिंताजनक बनली आहे. या भयावह दुसऱ्या लाटेशी झुंजणाऱ्या माझ्या भारतीय मित्रांना या लढ्यात पाठिंबा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने ही लाट थोपवण्यासाठी जिथे शक्य होईल तिथे मदत पोहोचवली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार रो खन्ना यांनी म्हटले आहे की, भारतातील ही स्थिती अत्यंत भयानक असून आपण आपल्याकडील जादाच्या 35 ते 40 दशलक्ष लसीच्या डोसवर नुसतेच बसून आहोत. या लसी आपण कधीही वापरणार नाही. या लसींचा आपण भारताला का पुरवठा करीत नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.
अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ रामनान लक्ष्मीनारायण यांनी म्हटले आहे की, करोनाच्या या लाटेमुळे भारतातील आरोग्य व्यवस्थाच कोसळण्याच्या स्थितीत येऊन पोहोचली आहे. त्यातून लक्षावधी लोकांचा जीव व त्यांची रोजीरोटी धोक्यात आली आहे. वॉलस्ट्रीट जर्नलने म्हटले आहे की, दिल्ली व भारतातील अनेक शहरांतील हॉस्पिटल्स रुग्णांनी पूर्ण भरली असून आता तेथून पेशंटला बेड्स व ऑक्सिजनअभावी पिटाळून लावले जात आहे.