काठमांडू – जगातील असाही कोणताही भाग राहिला नसेल जेथे करोनाचा संसर्ग पोहचला नसेल. आता तर जगातील सर्वात उंच पर्वत असलेल्या माऊंट एव्हरेस्टवरही करोना पोहचला आहे. नॉर्वेचा एक गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्ट सर करत होता. त्याच दरम्यान त्याला करोना संसर्ग झाल्याचे उघड झाले. या घटनेनंतर नेपाळच्या चिंतेत भर पडली आहे. एव्हरेस्ट चढाईचा हा मुख्य सिझन आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचे मुख्य साधन असलेल्या पर्यटनावर याचा विपरीत परिणाम होणार आहे.
मागील वर्षी देखील करोना संसर्गामुळे माऊंट एव्हरेस्टवरील गिर्यारोहण संपूर्ण सिझन बंदच राहिले. त्यामुळे नेपाळने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी क्वारंटाईन नियमांमध्ये सूट दिली. विशेष म्हणजे नेपाळमध्ये संसर्ग झालेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातही अडचणी येत आहेत. एव्हरेस्टवर करोना संसर्ग झालेल्या नॉर्वेच्या गिर्यारोहकाचं नाव एर्लेंड नेस आहे. त्याने फेसबूक मेसेजद्वारे माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्याला करोना संसर्ग झालाय आणि सध्या त्याची तब्येत स्थिर आहे. काठमांडूतील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
एर्लेंड नेस एव्हरेस्ट बेस कॅंपवर असतानाच त्याला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला तात्काळ एका हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. नेसच्या गिर्यारोहकांच्या पथकातील शेरपालाही कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे गिर्यारोहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पर्वतावर चढलेल्या गिर्यारोहकांना यामुळे अडचणी तयार होऊ नये अशीही अपेक्षा व्यक्ती केली जाते. कारण 8000 फूट उंचीवर करोना संसर्ग झाल्यास संबंधित गिर्यारोहकाला हेलिकॉप्टरने वाचवणे कठीण काम असेल.