मुंबई – उर्वशी रौतेला अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. यामुळे अनेकवेळा ती ट्रोलिंगची शिकार झाली आहे. उर्वशीने सोशल मीडियावर केलेली एक चूक तिला चांगलीच महागात पडली आहे. या चुकीमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
उर्वशीने तिच्या ‘ब्रो द अवतार’ या चित्रपटाचा सहकलाकार आणि पवन कल्याणचा उल्लेख आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असा केला आहे. उर्वशीने ट्विटरवर असा उल्लेख केल्यामुळे तिला मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
पवन कल्याण आणि साई धरम तेज यांच्यासोबतचा फोटो शेअर करत उर्वशीने लिहिले की, ‘ब्रो द अवतार या चित्रपटात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पवन कल्याणसोबत काम करणे खूप छान वाटले. हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.अहंकारी व्यक्तीला मृत्यूनंतर त्याच्या चुका सुधारण्याची संधी कशी मिळते याची थ्रिलिंग कथा यामध्ये पाहता येणार आहे.”
आता सर्व युजर्स उर्वशीला सांगत आहेत की पवन कल्याण नाही तर जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. याआधी देखील उर्वशीला सोशल मीडियावरील चुकीच्या पोस्टमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आताही नेटकऱ्यांनी तिला नको ते सल्ले देत अनेक गोष्टी सुनावल्या आहेत.
चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर पवन कल्याण, साई धरम तेज मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्याशिवाय केतिका शर्मा, ब्रह्मानंद, सुब्बाराजू हेही महत्वाच्या भूमिकेत आहेत. समुथिरकानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. थमन एस यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. विनोद सीतम या तमिळ काल्पनिक नाटकाचा हा रिमेक आहे.