Lok sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने आज आपल्या आणखी १७ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात बिहारमधील तीन, ओडिशातील आठ तर पश्चिम बंगालमधील एका उमेदवाराचा समावेश आहे. यादीतील सगळ्यांत लक्षवेधी नाव ठरले आहे ते आंध्र प्रदेशच्या कडप्पा मतदार संघातील. पक्षाने येथे कॉंग्रेसचे दिवंगत नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या कन्या वाय एस शर्मिला यांना रिंगणात उतरवले आहे.
विशेष म्हणजे शर्मिला यांचे बंधु वाय एस जगनमोहन रेड्डी यांचा स्वत:चा वायएसआर कॉंग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे व ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. भावा बहिणीत राजकीय मतभेद असल्यामुळे शर्मिला यांनी अगोदर आपला स्वतंत्र पक्ष काढत त्या तेलंगणात सक्रिय झाल्या होत्या.
मात्र नंतर त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलिन केला. आता कॉंग्रेसने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. कडप्पा हा राजशेखर रेड्डी यांचा बालेकिल्ला मानला जातो. आता तेथून त्यांच्या कन्येला उमेदवारी दिली असल्यामुळे या मतदार संघात शर्मिला आणि जगनमोहन यांचा उमेदवार यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे.
कॉंग्रेसच्या अन्य उमेदवारांमध्ये तारिक अनवर, मोहम्मद जावेद आणि अजित शर्मा (तिघेही बिहार) तर प. बंगालच्या दार्जिलिंग येथून डॉ. मुनीश तमांग यांना उमेदवारी दिली आहे. आंध्र प्रदेशच्या काकीनाडा येथे माजी शिक्षण मंत्री एम. एम. पल्लम राजू यांना संधी देण्यात आली आहे.