लखनौ – उत्तरप्रदेश सरकार राजकीय जाहिरातबाजीसाठी सरकारी निधीचा गैरवापर करत आहे. आमची सत्ता आल्यास त्या उधळपट्टीची चौकशी करू, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले.
उत्तरप्रदेशात सरकार स्थापन केल्यापासून भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. सत्ताधारी पक्षाच्या प्रचारासाठी सर्रासपणे सरकारी निधी वापरला जात आहे. माहिती खात्याच्या माध्यमातून राजकीय जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. सप सत्तेत असताना तसे कधी घडले नाही. मात्र, सध्या ते राजरोसपणे सुरू आहे. आम्ही कार्यातून बोललो. मात्र, विकासाचे खोटे दावे करण्यासाठी भाजपला जाहिरातबाजीचा आधार घ्यावा लागत आहे.
सप आणि भाजपमध्ये हाच फरक आहे, असे म्हणत अखिलेश यांनी भाजपच्या प्रचार मोहिमेची खिल्ली उडवली. फरक स्पष्ट आहे, अशी कॅचलाईन भाजपच्या प्रचार मोहिमेला देण्यात आली आहे. अयोग्य जाहिरातबाजीत सामील असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा इशाराहीं अखिलेश यांनी दिला.