इस्लामाबाद – पाकिस्तानचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांनी एका प्रकरणात थेट पंतप्रधान इम्रान खान यांनाच समन्स बजावण्याची धमकी दिली आहे. अफगाण सीमेजवळच्या लष्करी तळावर हल्ला केल्याबद्दल आरिफ गुल नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
त्याच्याविरोधातील खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील पिठाने हा इशारा दिला आहे. जर कोठडीत असलेल्या गुल याला न्यायालयासमोर हजर केले गेले नाही तर थेट पंतप्रधानांनाच समन्स बजावले जाईल, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
आरिफ गुल याला न्यायालयात हजर करण्याबाबत न्यायालयाने विचारणा केली असता तो कोठडीत आहे आणि त्याला न्यायालयात आणले जाऊ शकत नाही, असे अतिरिक्त ऍटर्नी जनरलनी न्यायालयात सांगितले होते.
गुल याच्या नागरिकत्वाचा मुद्दा न्यायालयात उपस्थित का केला गेला नव्हता? या प्रकरणाचा तपास 2019 पासून सुरू आहे. आरिफ गुलला ज्या कायद्याद्वारे ताब्यात ठेवले गेले आहे, तो आता वैध आहे का? असा प्रश्नही न्यायालयाने विचारला. “फाटा’ अर्थात “फेडरल ऍडमिनिस्टर्ड ट्रायबल एरिया’चे रुपांतर आता खैबर पख्तुन्वामध्ये झाले असल्याची आठवणही न्यायालयाने करून दिली.