आंबेडकरनगर, (उत्तर प्रदेश) – 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक परिवारवादी अयोध्येत कारसेवा करत असताना दिसतील, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टीवर खोचक टीका केली. आंबेडकर नगर येथे आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.
“2024 मध्ये आम्ही जेव्हा पुन्हा सत्तेवर येऊ तेव्हा बहुतेक परिवारवादी अयोध्येत रामभक्तांसह कारसेवा करत असताना दिसतील. भाजप सरकार “सब का साथ, सब का विकास’ वर विश्वास ठेवते.’ असेही आदित्यनाथ म्हणाले.
बसपावरही आदित्यनाथ यांनी खोचक टीका केली. हत्ती (बसपाचे निवडणूक चिन्ह) कोठेही घसरत असतो. सायकल (सपाचे निवडणूक चिन्ह) कोठेही पंक्चर होऊ शकते. ज्या लोकांनी गरिबांचे रेशन खाल्ले, त्यांच्यासाठी आमच्याकडे बुलडोझर आहेत.
या बुलडोझरच्या ताकदीमुळे त्याचा उपयोग बांधकामांसाठीही केला जातो आणि माफिया, भ्रष्ट मंत्र्यांची अवैध बांधकामे पाडण्यासाठीही केला जाऊ शकतो, असेही आदित्यनाथ यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीतील पाचव्या टप्प्याचे मतदान उद्या होणार आहे