लखनौ – उत्तर प्रदेशातील सोनभद्रच्या दुधी विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार रामदुलार यांना बलात्कार प्रकरणात, दहा लाखाच्या दंडासह २५ वर्षांच्या तुरुंगवासाची (अर्थात दुहेरी जन्मठेपेची) शिक्षा सुनावल्यानंतर विधानसभा सचिवालयाने दुधी जागा रिक्त झाल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
रामदुलार यांना १५ डिसेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रामदुलार यांना दोन वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा सुनावताच त्यांचे सदस्यत्व आपोआप संपुष्टात आले. विधानसभेचे प्रधान सचिव प्रदीप दुबे यांनी हे पद १५ डिसेंबरपासून रिक्त असल्याचे जाहीर केले आहे. ही जागा रिक्त घोषित करण्याची माहिती विधानसभेने मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनाही पाठवली आहे. आता दुधी जागेच्या पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोग जाहीर करणार आहे.
नोव्हेंबर २०१४ मध्ये महापौरपूर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल प्रकरणात रामदुलार मुख्य आरोपी होता. तसेच पोलिस तक्रार मागे घेण्यासाठी बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी त्याच्यावर वेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.