बारामती (प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा अर्ज दाखल केल्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारप्रमुखांची आज रितसर घोषणा करण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात आरोप- प्रत्यारोपाची राळ उठवली जात असताना प्रचार शिगेला पोहोचणार आहे. महायुतीतर्फे सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचे दिग्गज नेते हजर झाल्याने आता महायुतीने चांगलीच कंबर कसली असल्याचे दिसत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या समितीत प्रदीप गारटकर, वासुदेव काळे व किरण गुजर या तिघांचा समावेश असून ही समिती पूर्ण मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असेल. विधानसभा मतदारसंघनिहाय प्रचारप्रमुखपदी बारामतीत बाळासाहेब तावरे, इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडमध्ये आमदार राहुल कुल, पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे, खडकवासल्यामध्ये आमदार भीमराव तापकीर, भोर वेल्हामध्ये कुलदीप कोंडे व मुळशीमध्ये किरण दगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काही वेळातच या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना तर पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांना, दौंडमध्ये राहुल कुल व खडकवासला येथे भीमराव तापकीर यांना प्रचारप्रमुखपद देत राजकीय बॅलन्स साधण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याचे दिसते.
निवडणुकीत महायुतीच्या सर्वच घटक पक्षांना सोबत घेऊन जाताना आज स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना अजित पवार यांच्यासमवेत उपस्थित राहिले. महायुती ही मजबूत असून महायुतीत उत्तम समन्वय आहे, हा संदेश राज्यभर यानिमित्ताने या तिन्ही नेत्यांनी पोहोचविला आहे. आता कार्यकर्तेही जोमाने कामाला लागतील, अशी महायुतीची अपेक्षा आहे.
हर्षवर्धन यांच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी
काही दिवसांपूर्वी विरोध असलेल्या हर्षवर्धन पाटील व विजय शिवतारे यांनाही मुख्य प्रवाहात आणण्यात अजित पवारांना यश आले आहे. शुक्रवारी (दि. 19) हर्षवर्धन पाटील यांच्याकडे अजित पवार व सुनेत्रा पवार जेवणासाठी जाणार आहेत. महायुती एकसंघ असून कोणतेही मतभेद नाहीत, हा संदेश या निमित्ताने नेत्यांकडून दिला जात आहे.