सोलापूर – भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद आता वाढला आहे. बुधवारी पडळकर यांच्या गाडीवार हल्ला होता. तोच आज सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड कऱण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा कार्यालयाच्या काचेवर दगड मारुन तोडफोड करण्याचा प्रयत्न दोन इसमांनी केला आहे. रामलाल चौकातील कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला आहे. तोडफोड करणारे इसम हे आमदार पडळकर यांचे कार्यकर्ते असल्याचं बोललं जात आहे.
गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. गाडीवर हल्ला करणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही करण्यात आला होता.
पडळकर हे मागील काही दिवसांपासून शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. ते म्हणाले होते, मी लहान असल्यापासून ऐकतोय की शरद पवार पंतप्रधान होणार आहेत. मागील 30 वर्षांपासून ते भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा. साडेतीन जिल्ह्यांच्या बाहेर त्यांची पार्टी नाही. दिल्लीत हे नेते एकत्र जमले हे म्हणजे असं झालं की रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात अशा शब्दांत पडळकर यांनी टीका केली होती. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि पडळकर यांच्यातील वाद वाढला आहे.