सोलापुरात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने प्रतिकात्मक गळफास आंदोलन
सोलापूर: नोकरी गेल्याने जगणे झाले मुश्किल, इच्छा मरणाची परवानगी द्या, नाहीतर फाशी द्या, अशा घोषणा देत जवळपास बेरोजगार युवकांनी रोजगाराच्या मागणीसाठी सोलापुरात प्रतीकात्मक गळफास लावून आक्रमक आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधून घेतले.
सोलापूर शहर आणि ग्रामीण राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पूनम गेटसमोर गुरुवारी “युवा आक्रोश’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, युवकचे सोलापूर शहराध्यक्ष जुबेर बागवान आणि ग्रामीणचे युवकाध्यक्ष विक्रांत माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी आवाज उठविण्यात आला.
भाजप सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटी या आत्मघातकी निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. परिणामी उद्योगांवर मंदीचे सावट आले असून देशभरात कोटींच्यावर तर महाराष्ट्रात लाखांच्या घरात लोकांचे रोजगार गेले आहेत. सर्वत्र बेरोजगारी डोंगरासारखी वाढत चालली असतानासुद्धा सरकार मात्र तरुणांना रोजगार देण्याबाबत आणि ज्यांचे रोजगार गेल्यामुळे बेरोजगार झालेल्यांसाठी रोजगार निर्मितीबाबत कोणतेच पाऊल उचलताना दिसत नाही.
दुष्काळ आणि नापिकीमुळे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे. ज्यामध्ये अनेकांचे संसार उघड्यावर आले. आता बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस कमालीची वाढू लागली आहे. त्यामुळे आत्महत्येसारखे लोण बेरोजगारांपर्यंत पोहोचू नये यासाठी सरकारने तातडीने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलावीत यासाठी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत युवकांनी आपला आक्रोश व्यक्त केला.