करोना संसर्गाची साखळी तुटणे आवश्यक; बाधितांच्या दररोज वाढत्या संख्येने भीती
– सागर येवले
पुणे – स्वॅब (नमुने) संख्या वाढल्यामुळे करोना बाधितांची संख्या वेगाने समोर येत आहे. त्याचवेळी शहरात संसर्ग वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे दिवस-रात्र एक करूनही प्रशासनाला तिथपर्यंत पोहोचता येत नाही, हे निश्चित. पण, मग संसर्गाची ही साखळी तुटणार तरी कशी असा प्रश्न आहे. त्यामुळे दररोज वाढणाऱ्या करोना बाधितांच्या संख्येने पुणेकर दहशतीच्या वातावरणात आहेत.
शहरातील करोना संसर्ग पाहता, आरोग्य विभाग तरी आहे त्या मनुष्यबळात किती स्वॅब गोळा करणार? हा प्रश्न आहे. स्वॅब तपासणीसाठी एनआयव्ही, ससून रुग्णालयाकडे पाठविल्यावर दिवस-रात्र एक करूनही तपासणीचे काम उरकत नव्हते. त्यामुळे लॅबची संख्या वाढवण्यात आली. तोपर्यंत करोनाने उपनगरांतही पाय पसरले. तर, अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी लॉकडाऊन शिथिल केले. मात्र, बाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली. 30 मे रोजी साडेसहा हजारच्या आसपास असलेली बाधित संख्या 28 जूनपर्यंत तब्बल 16 हजारांवर पोहोचली आहे.
…हा सामूहिक संसर्ग नाही!
आतापर्यंत ठराविक भागात असलेला करोना संसर्ग अन्य परिसरांतही वाढला आहे. हा संसर्ग बाधिताच्या संपर्कात आल्यामुळे वाढलेला आहे. त्यामुळे त्याला “सामूहिक संसर्गाचा उद्रेक’ असे म्हणता येणार नाही. जी व्यक्ती बाधिताच्या संपर्कात आलेली नाही, परंतु तेथे जास्त बाधित सापडले अशावेळीच हा उद्रेक झाला असे म्हणू शकतो, असे आरोग्य अधिकारी सांगत आहेत.
हे करा
– आहारात रोग प्रतिकारक पदार्थांचा समावेश असावा
– आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा
– विशेषत: लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या.
करोनाची शहरातील “क्रोनोलॉजी’
– 9 मार्च – करोनाचा पहिला बाधित सापडला.
– मार्च अखेर-19 दिवसांत 28 बाधित सापडले.
– शासनाकडून लॉकडाऊन घोषित झाला
– आणि शहरात कर्फ्यू लागला.
– एप्रिलअखेर दीड हजारांवर बाधित सापडले.
– दररोज 600 ते 1200 च्या आसपास नमुने तपासणी करणे सुरू.
– पेठांसह कोंढवा, येरवडा, सिंहगड रोड, कॅम्प भागांत संसर्ग पसरला.
– स्वॅब घेण्याचे प्रमाणही 300 ने वाढवले.
– मे मध्ये एकूण बाधित साडेसहा हजार.
– जूनमध्ये हा आकडा सातत्याने वाढतच राहिला.
– जूनच्या अखेरच्या आठवड्यात
– बाधितांचा एकूण आकडा 16,742