कात्रज –कात्रज परिसरात सुंधामाता मंदिरामागे अंजलीनगर परिसरात अनधिकृतपणे गॅस सिलिंडर भरण्याचे काम सुरू असताना 25 सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण कात्रज परिसरा हादला. या दुर्घटनेत सुदैवाने जीवीत हानी झालेली नसली तरी या अवैध धंद्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलिसांनी 141 लहान तर 26 मोठे सिलेंडर जप्त केले आहेत. यात नामांकित कंपन्यांच्या गॅस टाक्या आढळून आल्या आहेत तसेच असे सिलिंडर विक्री करण्याची काही साखळी आहे का? याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी अनधिकृत गॅस सिलिंडर भरण्याचे कामे वेगाने सुरू होते. या ठिकाणाहून विचित्र वास येण्याच्या तक्रारी काही नागरिक करू लागले होते. घरगुती गॅसचा वास येत असल्याबाबत तसे काहींनी रासायनिक गॅसचा वास येत असल्याची कुजबुज सुरू झाली होती. याबाबत महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल तसेच पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे तक्रारी आल्या असत्या तर संबंधीत ठिकाणी कारवाई झाली असती. मात्र, नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर या ठिकाणी सिलिंडर स्फोटाची दुर्घटना घडली.
दरम्यान, कात्रज परिसरातील दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. या सर्वांना दि. 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या टाक्या कोठून आल्या, गॅसचा साठा करून ठेण्यात आला होता का? गॅस कोठून उपलब्ध होत होता? कशा प्रकारे हा अवैध धंदा सुरू होता, या सर्व प्रकारचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे.
सुंधामाता मंदिर परिसरातील घटना गॅस गळती होऊन झाली असलण्याची शक्यता आहे. यातील चार आरोपी अटकेत असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांना आवाहन देखील करीत आहोत, अशा प्रकारे कोठेही अवैद्य धंदे सुरू असतील तर त्याबाबत त्वरित पोलीस स्टेशनला कळवावे. यामुळे पुढील अनुचित प्रकार याला आळा घालण्यात येईल.
– जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक