जळोची – भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर बारमतीकरांचा दणका विसरलात का, असा प्रश्न बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित करून पडळकर यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला आहे. याबरोबरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात केलेले विधान मागे घेण्याची तंबीच दिली आहे.
नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे म्हणाल्या की, पद्मविभूषण देऊन सन्मानित केलेल्या शरद पवार यांच्याबाबत इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह विधान करून पडळकर यांनी स्वतःची लायकी दाखवून दिली आहे. लोकशाहीत तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही काहीही बोलू शकत नाही. तुमच्या वयाचा, कार्याचा आणि देशभरात पवार यांना असणारा मान या सगळ्याच गोष्टींचा विचार करून वक्तव्य करायला हवे होते, असे त्यांनी नमूद केले.
माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे म्हणाले की, महाराष्ट्रासह देशात शरद पवारांचे मोठ्या प्रमाणात कार्य आहे. त्यांची यशस्वी राजकीय कारकीर्द आहे आणि त्यांनी सर्वांच्या विकासासाठी भरीव काम केले आहे. त्यांच्याबाबत असे तुच्छ वक्तव्य करणे चुकीचे आहे. पडळकरांच्या या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.