पिंपरी – पिंपरी-चिंचवड, मावळमधील एकूण 13 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. युक्रेनच्या जाफ्रोदियामधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे भारतीय दूतावासाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. टप्प्याटप्प्याने दोन-चार दिवसांतच हे सर्व विद्यार्थी याभागातून बाहेर काढण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मोशीतील सतीश बोराटे यांनी दै. प्रभातशी बोलताना दिली.
तर एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलगी साक्षी हिने व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधत, याठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी भारतीय दूतावासाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. मोशीतील सतीश बोराटे यांची मुलगी साक्षी हि सध्या युक्रेनच्या झेडएमएसयू जाफ्रोदिया मेडीकल कॉलेजमध्ये एमबीएबीएसच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. रशियाने युक्रेनवर बॉम्बहल्ला केल्यानंतर तिच्या पालकांनी साक्षीशी संपर्क साधला.
युक्रेनमधील बॉम्बहल्ला क्षेत्रापासून जाफ्रोदिया हा भाग दूर अंतरावर आहे. याठिकाणी अडकेलेल्या भारतीयांना सुखरुपपणे मायदेशी आणण्यासाठी भारतीय दूतावसाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारतीयांना बाहेर काढण्यासाठी बसची व्यवस्था केली जात असून, टप्प्या-टप्याने नागरिकांना सुरक्षितठिकाणी हलविण्यास सुरुवात केली जात आहे. शुक्रवारी चार ते पाच बसची व्यवस्था केली असून, या भागातील नागरिकांना दहा ते पंधरा तासांच्या प्रवासानंतर सुरक्षित ठिकणीा आले जात आहे, अशी माहिती साक्षीच्या संपर्कात असलेल्या सतीश बोराटे यांनी दिली आहे. याठिकाणाहून विमानाने नागरिकांना भारतात सुखरुपपणे आणण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.भारतीय दुतावासाच्या या प्रयत्नांचे बोराटे यांनी कौतुक केले आहे.
परिस्थिती गंभीर
दरम्यान साक्षीने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाफ्रोदियामधील परिस्थितीची माहिती दिली आहे. जाफ्रोदियात असलेल्या किराणा मालाच्या वस्तुंचा साठा संपत आला आहे. विमानसेवा रद्द झाल्या आहेत. एटीएमबाहेर नागरिकांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. मात्र, एटीएम कार्ड चालत नाही. किराणा मालाच्या दुकानात नागरिक मोठ्या संख्येने येत असून, दुकानातील वस्तुंचा साठा संपत चालला आहे. आम्हाला या ठिकणाहून नाहेर काढण्यासाठी भारतीय दूतावासाने प्रयत्न करावत, अशी विनंती तिने या व्हिडिओतून केली आहे.