मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पडलेल्या दोन गटामुळे शिवतीर्थ अर्थात दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार दसरा मेळावा कोण घेणार, यावर बरीच चर्चा रंगत आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचा निर्धार केला आहे.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या उद्धव कदम यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी बंडखोर शिंदे गटावरही टीकास्त्र डागले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, संभ्रम कोणाचा नाही.. दसरा मेळावा शिवतीर्थावर शिवसेनेचाच (shivsena) होणार, संभ्रम निर्माण करणाऱ्यांना संभ्रम करू द्या. शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवतीर्थावर येण्याची तयारी केली आहे. तांत्रिक-मांत्रिक काही भाग असेल ते बघतील. पण दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून शिवतीर्थावर दरवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी कुणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यात शिंदे गट आणि शिवसेना दोघांनीही दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली आहे. पण अद्याप पोलिसांकडून कोणालाही परवानगी मिळाली नाही. तसेच गणेशोत्सवानंतर याबाबत निर्णय घेणार असल्याचे पालिका आयुक्तांनी जाहीर केले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असल्याची घोषणा केली.
संभाजी ब्रिगेडनंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या शिवसेना पक्षप्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणाले, दोन दिवसांपूर्वी संभाजी बिग्रेड शिवसेनेसोबत आली. आज संघ परिवारातील लोकं हिंदुत्वाच्या शिवसेनेच्या परिवारात आले आहे. हिंगोलीतील मातब्बर लोक शिवसेनेत प्रवेश करत आहे. हा पक्षप्रवेश रोज सुरू आहे. सत्ताधारी पक्षाकडे पक्षप्रवेशासाठी रांग लागत आहे.
आज महाराष्ट्रात प्रथमचं वेगळं चित्र दिसत आहे की, गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती मर्दांना जन्म देते, गद्दारांना जन्म देत नाही याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेत येत आहे. आम्ही हिंदुत्व सोडल्याची आवई भाजपेने उठवली होती. त्या आवईला छेद देणारी आजची घटना आहे, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे. (Uddhav Thackeray said Dasara gathering will be held by Shiv Sena at Shivtirth)