मुंबई – राहुल नार्वेकरांनी यांनी उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद असंविधानिक असल्याच म्हणत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला होता. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीच्या आधारे हा निर्णय देत असल्याचे नार्वेकर यांनी म्हंटले होते. मात्र या सर्व बाबी खोडून काढत पक्षातील निवडणूका संविधानिक पद्धतीने झाल्या असल्याचे उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत २०१३ आणि २०१८ मध्ये पक्ष संघटनेत बदल करण्यासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकांचे व्हिडीओ दाखवण्यात आले. विशेष म्हणजे २०१३ मध्ये पारित करण्यात आलेल्या प्रस्थावादरम्यान सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी ऐतिहासिक निर्णय देत शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निवाडा केला. यावेळी नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे गटातील एकही आमदाराला आपत्र न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यावेळी नार्वेकरांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदावर प्रश्नचिन्ह निर्माण करत निर्णय दिला होता. मात्र आज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर करण्यात आलेले बदल पक्षीय निवडणुकांतून करण्यात आल्याचे दाखवून दिले.
या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी सांगितलं की २०१३ साली शिवसेनेच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली होती. तसेच पक्षांतर्गत निवडणूक घेऊन उद्धव ठाकरे यांची पक्षाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. या निवडणुकीचा व्हिडीओ परब यांनी यावेळी दाखवला. तसेच त्या निवडणुकीवेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही तिथे उपस्थित होते. कारण त्यावेळी नार्वेकर हे शिवसेनेत होते हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून आले.
उद्धव ठाकरेंनी ‘जनता न्यायालय’ म्हणत एक पत्रकार परिषद घेतली.या परिषदेला वकिलांची मोठी फौज देखील हजर होती. यावेळी अनिल परब यांनी शिवसेनेच्या पक्ष घटनेमध्ये बदल करण्यात आलेल्या वेळेसचे व्हिडिओच सर्वांसमोर दाखवल्याने एकच खळबळ उडाली.