सातारा : सातारा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी 90 हजार मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या विरोधी पक्षांच्या जागांमध्ये यंदा चांगलीच वाढ झाली आहे. अनेक जागांवर बंडखोरांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रीनीवास पाटील यांनी उदयनराजेंवर मात करत सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे राखली.
आज हरलो आहे पण थांबलो नाही,
जिंकलो नाहीं पण संपलो ही नाही.लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखों जनतेचे तसेच दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार.
सदैव आपल्या सेवेशी तत्पर. pic.twitter.com/yFe2RdssiU— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) October 25, 2019
साताऱ्याचा निकाल हा भाजपा आणि महायुतीसाठी धक्कादायक मानला जातो आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश करत पोटनिवडणुकीत उडी मारली होती, मात्र त्यांचे हे पक्षांतर मतदारांना अजिबात रुचले नाही. या पराभवानंतर उदयनराजेंनी, जिंकलो नाही पण संपलो ही नाही अशा आशयाचे ट्विट करत सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.
मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये उदयनराजे पहिल्या काही फेऱ्यांचा अपवाद वगळता पिछाडीवरच होते. उदयनराजेंसोबतच विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. परळीतून पंकजा मुंडे, मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे, पुरंदरमधून शिवसेनेचे विजय शिवतारे, बीडमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांनाही पराभव पत्करावा लागला आहे.