पुणे, – ग्रेसिया स्पोर्ट्स मॅनेजमेंट यांच्या तर्फे आयोजित ‘विराट करंडक’ १४ वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत एके स्पोर्ट्स संघाने विजयी सलामी दिली. अष्टपैलू स्पोर्ट्स संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून गुणांचे खाते उघडले.
धायरी येथील स्टार स्पोर्ट्स अॅकॅडमी मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात जय बुबुळे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अष्टपैलू स्पोर्ट्स संघाने सय्यद क्रिकेट अॅकॅडमीचा १९ धावांनी पराभव केला. हा संघाचा पहिला विजय ठरला. पहिल्यांदा फलंदाजी करताना अष्टपैलू स्पोर्ट्स संघाने १४९ धावा धावफलकावर लावल्या.
जय बुबुळे याने ५५ चेंडूत ११ चौकारांसह ५९ धावांची खेळी केली आणि संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानासमोर सय्यद क्रिकेट अॅकॅडमीचा डाव १३० धावांवर मर्यादित राहीला. श्रीराज जगताप (४० धावा) आणि अव्देत वाणी (४० धावा) यांनी संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला, पण विजय मिळवण्यात त्यांना अपयश आले. जय बुबुळे याने गोलंदाजीमध्येसुद्धा चमकदार कामगिरी करताना १७ धावात ३ गडी बाद केले.
प्रांजली पिसे हिने केलेल्या नाबाद ६७ धावांच्या जोरावर एके स्पोर्ट्स संघाने साई एमजे स्पोर्ट्स अॅकॅडमीचा ९ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळताना साई एमजे स्पोर्ट्स अॅकॅडमीला ११५ धावा जमविता आल्या. आदित्य घाडशी याने २४ धावा करून संघाचा डाव सावरला. एके स्पोर्ट्च्या प्रांजली पिसे आणि ऋषभ कुलकर्णी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत प्रतिस्पर्धी संघाच्या डावाला वेसण घातली. दुसर्या डावात प्रांजली पिसे हिने ५५ चेंडूत १५ चौकारांसह नाबाद ६७ धावांची खेळी करून एके स्पोर्ट्स संघाला एकहाती विजय मिळवून दिला.