पिंपरी (प्रतिनिधी) – मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सहा लाख मिळकतींमधील सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. आज शेवटच्यादिवशी (दि.2) सकाळी आठ वाजताच सुरु केलेले काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. अखेर दिवसभरात हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली. सर्वेक्षण शंभर टक्के पूर्ण झाल्याचा महापालिकेने दावा केला आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचे काम शहरात 23 जानेवारीपासून सुरू करण्यात आले होते. 23 ते 31 जानेवारीच्या काळात शहरातील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी महापालिका शिक्षकांसह एकूण 2,143 अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. हे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली होती.
पहिल्याच दिवशी अॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे सर्वेक्षणाला विलंब झाला आहे; परंतु त्यानंतर काम सुरळीत सुरू झाले. मराठा मागासलेपणाचा सर्वेक्षण सात दिवसांत करण्याच्या सूचना होत्या. त्याकरिता दि. 31 जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती. या कालावधीत काम पूर्ण होणार नसल्याने दोन दिवस मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी राज्य मागासवर्ग आयोगाकडे सर्वस्तरातून करण्यात आली होती. ही मागणी मान्य करत, सर्वेक्षणासाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. शुक्रवारी (दि.2) ही मुदत संपत होती.
या सर्वेक्षणाकरिता महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची नोडल अधिकारी पदी नियुक्त करण्यात आली होती. तर आठ क्षेत्रीय अधिकार्यांची सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर या सहाय्यक नोडल अधिकार्यांसाठी प्रत्येकी एक सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आली होती. तर 1974 प्रगणक व 127 पर्यवेक्षक फिल्डवर कार्यरत होते. तर सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या कार्यालयातील 10 कर्मचारीदेखील या कामासाठी कार्यरत होते.
अखेरच्या दिवशी 40 हजार कुटुंबांचे सर्वक्षण
सर्वेक्षणाला दोन दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर एक दिवस अगोदर शहरातील 5 लाख 60 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते. अखरेच्यादिवशी 40 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे आव्हान कर्मचार्यांसमोर होते. हे आव्हान पेलण्यासाठी सकाळी आठ वाजताच सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात आले होते. शेवटी सायंकाळी उशिरापर्यंत हे काम पूर्ण करण्यात प्रगणकांना यश आल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.