सातारा – कोडोली (ता. सातारा) येथील दत्तनगर येथे कृष्णा नदीपात्रात कपडे धुवून पोहण्यास गेलेल्या दोन युवक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची घटना घडली. पोलीस व शिवेंद्रराजे ट्रेकर्सना एकाचा मृतदेह हाती लागला आहे तर दुसऱ्या बेपत्ता युवकाला शोधण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शनिवारी तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
सागर एस सिद्धाप्पा (वय 19, रा. नेहरु कॉलनी, गौरीबिदनुर, कर्नाटक) व गंगाप्पा गारी आदर्श (वय 20, रा. कोनापुरम, अनंतपूर आंध्रप्रदेश) अशी बुडालेल्या युवकांची नावे असून गंगाप्पा गारी आदर्श याचा मृतदेह सापडला आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोडोली येथील दत्तनगर येथे कर्नाटक, मध्यप्रदेश आंध्रप्रदेश येथील सुमारे 12 ते 15 जण एकत्र राहत होते. ते सर्वजण ऍग्री प्रॉडक्टचे सेल्समन म्हणून काम करत होते. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास येथील कृष्णा नदीपत्रात कृष्णधाम येथे कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी कपडे धुवून झाल्यानंतर ते पाण्यात आंघोळीसाठी उतरले.
त्यातील सागर व गंगाप्पा यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील पोलीस पाटील व पोलीस प्रशासनाला दूरध्वनीद्वारे माहिती देताच सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे व त्यांची टीम तसेच शिवेंद्रराजे ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नदीपात्रातून दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यातील गंगाप्पा आदर्श याचा मृतदेह सापडला. तर दुसऱ्याला शोधण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.