कोल्हापूर /प्रतिनिधी- अखेर कोल्हापुरात कोरोना विषाणूंनी प्रवेश केला आहे. एकीकडे पेठवडगावची महिला कोरोना पाझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले असतानाच कोल्हापूर शहरातील एक ३९ वर्षांचा पुरूष कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल सीपीआर प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ही माहिती मिळताच आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी रात्री ११ वाजता सीपीआरकडे धाव घेतली.
तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा व वैद्यकीय सेवा खडबडून जागी झाली असून,सर्वांसमोर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यत शांत असलेल्या कोल्हापूर शहरात अखेर गुरुवारी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने सर्वच यंत्रणा आणखी गतीने कामाला लागली आहे.
पुण्याहून ही व्यक्ती २० मार्च रोजी कोल्हापुरात आली आहे. त्यानंतर तिला बुधवार दि. २५ मार्च रोजी ताप आला व घशात खवखव जाणवू लागली. त्यामुळे सीपीआरमध्ये या व्यक्तिची तपासणी करून घेण्यात आली. तसेच दाखलही करून घेण्यात आले.
दरम्यान गुरूवारी रात्री ही या व्यक्तिचा अहवाल पाझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकाच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.