मुंबई, दि. 26 (प्रतिनिधी) – इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील 27 खासगी प्रयोगशाळांना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे 8 लॅब महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील खासगी तपासणी केंद्रांना केंद्र शासनाने करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता देण्याची शिफारस राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केंद्र शासनाकडे करण्यात आली होती, असे अमित देशमुख यांनी सांगितले.
थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड, नवी मुंबई, सबर्बन डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड, मुंबई, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, नवी मुंबई, एस. आर. एल. लिमिटेड, मुंबई, ए.जी. डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल लॅबरोटरी, मुंबई आणि इन्फेक्शन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे या खासगी लॅबचा यात समावेश आहे. यामुळे कोरोना तपासणी अधिक जलद गतीने होऊ शकेल आणि रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होतील. ही तपासणी केंद्रे पूर्ण क्षमतेने चालविल्यास दररोज एकूण 2 हजार संशयित रुग्णांचे नमुने तपासणी करणे शक्य होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.