पिंपरी – सिंहगड एक्सप्रेस गाडी नेहमीच्या ठिकाणापेक्षा तीन डबे पुढे गेली. त्यामुळे झालेल्या धावपळीत दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. 17) सकाळी पिंपरी येथे घडली.
पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी सिंहगड एक्सप्रेस ही सकाळी 6.05 वाजता पहिली गाडी आहे. मंगळवारी सकाळी पिंपरी आणि चिंचवड स्थानकावर दररोज ज्या ठिकाणी थांबते त्याच्या तीन डबे पुढे जाऊन थांबली. त्यामुळे आपला रोजचा डबा पकडण्यासाठी प्रवाशांनी एकच धावपळ उडाली. त्यातच गाडी वेगात असल्याने सुनील मेमन यांच्यासह अनेकजण फलाटावर पायात पाय अडकून पडले. मेमन हे रेल्वे आणि फलाटाच्या मध्ये अडकून रेल्वे रुळावर पडले.
त्यामध्ये त्यांची पायाची तीन बोटे रेल्वेच्या चाकाखाली सापडली. तसेच पाठीला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी भोसरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे रेल्वे स्टेशनवर प्रथमोपचाराची सुविधा देखील मेमन यांना मिळाली नाही.”
पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष इकबाल मुलाणी म्हणाले की, “सिंहगड एक्सप्रेस नियोजित ठिकाणी न थांबल्याने तसेच गाडी वेगात असल्यामुळे प्रवाशांची धावपळ उडाली. यात काही प्रवासी जखमी झाले आहेत. याकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. फलटावर रेल्वे आल्यानंतर रेल्वेचा वेग कमी असावा.