शिवसेना नगरसेविकेच्या दिरासह आठ जणांवर गुन्हा केला दाखल
नागापूर परिसरात फवारणी करत असताना मारहाण
आम्ही सांगू तेथे फवारणी करण्यासाठी आणला दबाव
नगर – करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात चार पाच दिवसांपासून औषध फवारणी सुरु आहे. जीव धोक्यात घालून कर्मचारी फवारणी करीत आहेत. बुधवारी (दि.1) रोजी नागापूर परिसरात फवारणीचे काम सुरु असतांना कर्मचाऱ्यांना नगरसेविकेच्या नातेवाईकांकडून दोन कर्मचाऱ्यांना 8 ते 10 जणांकडून जबर मारहाण केली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी निलेश भाकरे व त्याचे 7 ते 8 साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुरेश वाघ आणि अविनाश हंस असे मारहाण झालेल्या जखमी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. महापालिकेच्यावतीने दररोज मध्यरात्री दोन-तीन वाजेपर्यंत फवारणीचे काम करण्यात येते. नागापूर गावठा येथील महापालिका कार्यालयाजवळ मध्यरात्री 1 वाजता फवारणी करण्यात येत होती. त्यावेळी निलेश भाकरे व त्याच्या आठ सहकारी घटनास्थळी आले. त्यांनी या दोघांनाही आमच्या हिशोबाने फवारणी करा, असं बजावलं.
त्याला या दोन्ही कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने त्यांनी त्यांच्याकडील पाईप हिसकावून घेऊन त्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने जोरदार मारहाण केली. त्यामुळे वाघ आणि हंस हे दोघेही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भाकरे आणि त्याच्यासह आठही अनोळखी सहकाऱ्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.