वेल्हे -वेल्हे तालुक्यातील करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या वडगाव झांजे येथील आणखी दोघांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर बाधित रुग्णाच्या घरातील 6 जणांना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती वेल्हे प्रशासनाकडून मिळाली.
वडगाव झांजेमधील बाधित करोनावर मात करीत असल्याचे आशादायक चित्र दिसत असताना शनिवारी (दि. 23) पुन्हा एकाच घरातील दाम्पत्यास करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने पुन्हा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. करोनाची साखळी तुटण्याची शक्यता वाटत असतानाच पुन्हा करोनाने आपले तोंडवर केले आहे.
शनिवारी आढळलेल्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 36 व 32 वर्षीय पती-पत्नींचा समावेश असून त्यांच्याच घरातील आई, वडील, 12, 10, 8 वर्षांच्या तीन मुली व 6 वर्षाचा एक मुलगा अशा 6 जणांना कोविड तपासणीसाठी पुणे येथे रविवारी (दि. 24) पाठविण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवकर यांनी सांगितले. दरम्यान, वेल्हे तालुक्यातून करोनाबाधितांची संख्या 29 वर गेली असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून 15 जणांनी करोनावर मात केली आहे.
‘त्या’ मुलाचा अहवाल “निगेटिव्ह’
बाधित रुग्णांच्या संपर्कातील 32 जणांचे स्वॅब बुधवारी (दि. 20) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते; परंतु दुसऱ्या टप्प्यात पाठवलेल्या एका 12 वर्षांच्या मुलाचा अहवालच गहाळ झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या मुलाचे शुक्रवारी (दि.22) पुन्हा एकदा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. अखेर शनिवारी (दि. 23) त्याच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे प्रशासनाने सांगितले.